काही दिवसांपूर्वी, बांद्रा(पूर्व) स्टेशनला मित्राबरोबर तिकीट काढायला गेलो होतो (मुंबई-ठाण्याच्या मराठी मुला-मुलींच्या भाषेत बोलायचं झालं तर..... "गेलेलो"). त्याचं तिकिट काढून होईपर्यंत वेळ काढायला म्हणून मी समोरच्या बाजूला पाहत बसलो होतो. आणि समोरच्या झोपडपट्टी-कम-इमारतींकडे पाहून पोटात कसंतरी झालं. येवढ्या छोट्या जागांमध्ये कोंबल्यासारखी वस्ती वाढली होती. तिथे कित्येक लोक दाटीवाटीने बसून काहीतरी शिवणकाम करत होती. इमारतीच्या मागच्या बाजूला काही खिडक्या आणि संपूर्ण सपाट भाग. मध्येच एक ३x२ ची एक छोट्या खोलीसारखा भाग इमारतीच्या मागच्या बाजूला project झाल्यासारखा पूढे आला होता. थोडं व्यवस्थीत पाहिल्यावर कळालं की ते संडास/बाथरूम होतं. त्याला खालून आधार फक्त एका लोखंडी पट्टीचा. त्यावेळेस आकस्मिकपणे डोक्यात विचित्र विचार येऊन गेला.. साला पूढे जर इथे भूकंप, किंवा असं काही झालं तर काय हालत होईल ह्या लोकांची. आणि मी माझ्या मित्राशी बोललो सुद्धा.
दुर्दैवाने काही दिवसांमध्येच बेहरामपाड्यामधल्या झोपडपट्टीला लागलेल्ता आगीची बातमी समजली. राजकारणाचे, काही स्वयंसेवी संस्थांचे अस्तित्व येणकेण प्रकारेण जाणवले. आपल्याकडे आता बऱ्याच गोष्टींचं बाजारीकरण झालंय, व्हायला लागलंय. "विध्वंस" ही मसाला चित्रपटासारखी पाहण्याची गोष्ट झालीय. तर हा विनाश पहायला लोक जमाव करून, गर्दी करून स्कायवॉकवर यायला लागले. मूंबईमध्ये असंवेदनशीलता जाणवण्या इतपत अहे. (अंगावर येते असं म्हणणं .. इथला जगण्याचा वेग पाहता कदाचित सयुक्तिक नाही होणार, पण आहे हे मात्र जाणवलं). मला सगळ्यात एका गोष्टीचा फार राग आला.
साला इथे लोकांना खाण्याची, पिण्याची, नैसर्गिक प्रक्रियांची अजूनही व्यवस्थीत सोय नाही होऊ शकलीये(तात्पुरत्या स्वरूपामध्ये स्वयंसेवी संस्थांनी, शासनाने काही अंशी प्रयत्न केलेत) .. पण तिथल्या लोकांची गैरसोय आहे हे नक्की. येबढं असून, जळून खाक झालेल्या एका झोपडीच्या जागी, एका भाईने ठेला लावलाय आणि तो तिथे गुटखा, तंबाखू, सिगरेटस विकतोय. म्हणजे ....
-धनंजय


